| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहराच्या निर्मितीच्या 176 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शहरात आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली. नगरपरिषदेत असलेले 20 नगरसेवक नगरसेविका, दोन स्वीकृत नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष यांनी प्रत्येकी एक वृक्ष लागवड करून त्यांचे पालकत्व स्वीकारले. शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ भागात ही पालकत्व योजना राबविण्यात आली.
ब्रिटिशांनी 21 मे 1850 मध्ये माथेरानचा शोध लावला. ब्रिटिश देश सोडून गेले पण आजही माथेरान मधील ब्रिटिश राजवटीच्या खाणाखुणा कायम आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळात शोध लावण्यात आलेले माथेरान हे शहर आजही आपल्या शहराचा स्थापना दिवस साजरा करीत आहे. माथेरान नगरपरिषदेच्यावतीने माथेरान शहराचा वाढदिवस साजरा करीत असताना अनेक नवीन संकल्पना आणि उपक्रम राबविण्यात भर देत आहे. माथेरान मधील वनराई टिकवून ठेवण्यासाठी आणि हिरवेगार माथेरान हा वारसा जपण्यासाठी झाड पालकत्व ही संकल्पना राबविण्यात आली. माथेरान नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक तसेच निवडून आलेले 20 नगरसेवक अशा 23 लोकप्रतिनिधी यांनी वृक्ष पालकत्व संकल्पना राबविली. शहराच्या मुख्य रस्त्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर प्रत्येक लोकप्रतिनिधी कडून एक झाड लावण्यात आले. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार, गटनेते शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक मनोज खेडकर, स्वीकृत नगरसेवक प्रवीण सकपाळ, लोकप्रतिनिधी सुनील शिंदे, गौरंग वाघेला, रिझवान शेख, ऐश्वर्या तोरणे, सुरेखा साळुंखे, लता ढेबे, कमल गायकवाड, अनुसया ढेबे, अनिता रांजणे, अर्चना भिलारे, प्रियंका कदम, प्रतिभा घावरे, किरण पेमारे, सोहेल महापुले, किशोर मोरे यांच्या हस्ते ही झाडे लावण्यात आली.







