आंबेत खाडीत कांदळवनाची बेसुमार कत्तल

मनसेची प्रांतांकडे कारवाई करण्याची मागणी

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडी किनारपट्टी भागात दोन एकर जागेत असलेल्या  कांदळवन क्षेत्रातील भागात काही व्यावसायिकांनी कांदळवनाची बेसुमार कत्तल केल्याचे उघड झाले आहे. याबाबत मनसे नेते अमित शिंदे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाला महिना उलटला तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप  मनसेचे रायगड जिल्हा रस्ते साधन सुविधा व आस्थापना  जिल्हा सचिव शेखर सावंत यांनी केला आहे.

गट न 335 आणि 350 मध्ये हे कांदळवन क्षेत्र असलेल्या भागात काही व्यावसायिक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि व्यवसायासाठी बेसुमार कत्तल करत असल्याची माहिती निदर्शनात येताच स्थानिकांसह मनसेनेदेखील याबाबत कडक कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला सूचित केले. मात्र, आज तिन्ही विभागाकडून हा अहवाल संबंधित प्रांतांना सादर करूनदेखील अद्याप कारवाई होत नसल्याने अखेर मनसे नेते अमित शिंदे यांनी श्रीवर्धन म्हसळा प्रांताधिकारी डॉ. दीपा भोसले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत तक्रार केली. यावर प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित जागेची मी स्वतः पाहणी करून लवकरच याबाबत योग्य ते आदेश देऊन दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

 आंबेत विचारेवाडी येथील सावित्री खाडी किनारपट्टीलगत कांदळवनाची कत्तल करून भूमाफियांकडून अतिक्रमण सुरू आहे. याबाबत संबंधित महसूल, वनविभाग यांच्याकडे तक्रार करुनही आरोपी मोकाट फिरत होते. मात्र, प्रांताधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले असून, त्या योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे.

अमित शिंदे, मनसे नेते

कांदळवनांची कत्तल ही पर्यावरणाला हानी पोहोचविणारी असून, याबाबत आमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विचारेवाडी हद्दीतील कांदळवन कत्तलीचे पंचनामे केले आहेत.  संबंधित जागा मालक आणि व्यावसायिक यांच्यावर योग्य कारवाई होईल.

डॉ. दीपा भोसले, प्रांताधिकारी

Exit mobile version