देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने – शरद पवार

। सांगली । वृत्तसंस्था ।
देशात सध्या धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात असून, राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. राष्ट्र एका वेगळ्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रातही अनेक कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. त्यांनी हा देश उभा केला. विकासाचं राजकारण केलं. माणसं जोडण्याचं राजकारण केलं. पण आज देशामध्ये धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगली येथे बोलताना केली.

सांगली दौर्‍यावर आलेल्या पवारांनी जाहीर कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
कर्नाटकात भाजपाचं राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. पण तो अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं? हा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. त्यामुळे या धर्मांध वृत्तींच्या विरोधात देखील आपल्याला लढाई द्यायची आहे, असं शरद पवार म्हणाले .

Exit mobile version