नवदाम्पत्यांसाठी युगल सुरक्षा योजना

रायगड डाक विभागाकडून आगळीवेगळी भेट
| सारळ | वार्ताहर |
सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. लग्नाच्या निमिताने नवविवाहित दाम्पत्याला जवळचे लोक वेगवेगळ्या वस्तू भेट देत असतात. काहीवेळेला या वस्तू त्यांच्याकडे अगोदरच असतात. त्यामुळे दाम्पत्याच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. अशावेळी त्यांना काय भेट हा प्रश्‍न त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना पडू शकतो. यावर एक छान मार्ग रायगड डाक विभागाने दाखवून देत एक नवीन सुरुवात केली आहे.

लग्नसमारंभात नवदाम्पत्याला भेट देण्यासाठी युगल सुरक्षा नावाची एक विमा पॉलिसी पोस्ट ऑफिसकडे उपलब्ध आहे. या योजनेमध्ये पती-पत्नी दोघांचा एकत्र विमा उतरवला जातो. नवरा-बायको दोघांनाही यामध्ये साध्या प्रीमियमसह आयुष्य मिळतो. 5 वर्ष ते 20 वर्ष मुदत असणारी ही विमा पॉलिसी लग्न केलेल्या व्यक्तीलाच काढता येत असल्याने नवपरिणीत दाम्पत्याच्या लग्नाच्या दिवशी या पॉलिसीचा प्रीमियम भरून ही विमा पॉलिसी त्यांना भेट देता येऊ शकते.

एकच पॉलीशी, एकच विमा हप्ता यामधून पती-पत्नीचे एकत्रित विमा संरक्षण या पॉलिसीमधून घेता येत असल्याने याला विमाही म्हणता येईल. 20 वर्षे मुदतीसाठी सामाहिक वय 21 असलेल्या जोडप्याला 1 लाख रुपये विम्यासाठी रु. 420/- व 40 वर्षे सामाहिक वय असलेल्या जोडप्याला रु. 470/- दरमहा इतका कमी विमा हप्ता भरावा लागतो. मुदतपूर्तीनंतर आताच्या व्याजदराप्रमाणे साधारणतः 2 लाख 4 हजार रुपये मिळतात. युगल सुरक्षा म्हणजे, विम्याच्या कालावधीत दोघांपैकी काही बरं-वाईट झालं तर दुसर्‍याला बोनस सहित विम्याची पूर्ण रक्कम मिळते. मुदतीमध्ये काही झाले नाही तरीही मुदतपूर्तीनंतर विम्याची पूर्ण रक्कम व बोनस विमाधारकास मिळतो. त्यामुळे दोन्ही बाजूने फायदा विमा घेणार्‍या दांपत्याचाच आहे.

लग्नाच्या दिवशी विमापत्र भेट
नागोठणे रायगड डाक विभागात कार्यरत असणार्‍या ज्ञानेश राजे या कर्मचार्‍याच्या लग्नानिमित्त त्याच्या लग्नाच्या दिवशी युगल सुरक्षा विमा पॉलिसी काढून त्याचे विमापत्र लग्नात भेट म्हणून दिले. सर्वसामन्य जनतेसाठी असणार्‍या या योजनेची माहिती लोकांना मिळावी, असा उद्देश यामागे असल्याचे रायगड डाक विभागाचे अधीक्षक डॉ. संजय लिऐ यांनी सांगितले. ते स्वतः यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version