खारफुटीवरील कचराप्रकरणी न्यायालयाची दखल

13 आक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश
। जेएनपीटी । वार्ताहर ।
मुंबई उच्च न्यायालयाने बोरी पाखाडी येथील डंम्पिग ग्राऊंडच्या खारफुटीवर उरण नगरपरिषदेने कचरा टाकणे अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. उनपने न्यायालयाला दिलेल्या आश्‍वासनाचे पालन न केल्याबद्दल पालिकेवर नाराजी व्यक्त करतानाच 13 ऑक्टोबरपर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
उरण नगरपरिषदेचा कचरा टाकण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून बोरी पाखाडी येथे जागा दिली होती. मात्र या जागेच्या बाजूला सर्वत्र खारफुटी आहे. डंम्पीग ग्राऊंडला दिलेल्या जागेत कचरा संपूर्ण भरला असल्यामुळे हा कचरा बाजूच्या खारफुटींवर पसरला जात आहे. तसेच बाजूला असलेल्या हनुमान कोळीवाडा या गावाला या डंम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी तसेच प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात हनुमान कोळीवाडा गावातील मच्छिमार विकास संस्थेने 2018 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उरण नगरपरिषदेने खारफुटी असलेल्या प्रतिबंधीत जाग्यावर कचरा न टाकण्याचे आणि लवकरच डंम्पिग ग्राऊंडसाठी इतरत्र जागा शोधण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
मात्र तरीदेखिल नगरपरिषदेचा कचरा बाजूच्या खारफुटींवर जेसीबाच्या सहाय्याने पसरला जात असल्याचे आणि खारफुटीवरील कचर्‍याला आगी लावल्या जात असल्याचे छायाचित्रांच्या सहाय्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे उच्च न्यायालयाने या बाबत नाराजी व्यक्त केली असून नगर परिषदेला येत्या 13 आक्टोबरला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या बाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.

Exit mobile version