। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून परवागनी मिळालेली नाही. त्यासाठी आता प्रयत्न केले जात असून भारतात जानेवारीपासून आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक स्तरावर कोव्हॅक्सिन लशीचा वापर सुरु करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर परदेशी जाणार्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली नसल्यानं कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही नागरिकांना क्वारंटाइनसह कोरोनाच्या इतर नियमांचे पालन करावे लागत आहे. लशींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश व्हावा यासाठी भारत बायोटेक प्रयत्नशील आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं ट्वीटरवरून माहिती देताना म्हटले आहे की, कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी मिळायला हवी याची आम्हाला कल्पना आहे. यासाठी अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. मात्र लशीला परवानगी देण्यासंदर्भात आम्ही कोणतीही घाई करू शकत नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या लशीला आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याआधी ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे पाहणे गरजेचे आहे. सध्या भारत बायोटेककडून अधिकचा डेटा यासाठी आवश्यक असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.