‘कोव्हॅक्सिन’ही 77.8 टक्के प्रभावी

लॅन्सेटच्या अभ्यासात माहिती उघड
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोव्हिड-19 विरुद्ध स्वदेशी लस कोव्हॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या युद्धात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डनंतर फक्त कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे. ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.
लॅन्सेटद्वारे एक विधान जारी करण्यात आले होतं की, निष्क्रिय व्हायरस तंत्रज्ञानाचा वापर करून कोव्हॅक्सीन दोन डोस दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर एक मजबूत अँटीबॉडी प्रक्रिया सुरू करते. जर्नलमध्ये असे म्हटले आहे की, चाचणीदरम्यान लस-संबंधित मृत्यूची कोणतीही गंभीर प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. भारतात नोव्हेंबर 2020 ते मे 2021 पर्यंत चाललेल्या या चाचणीमध्ये 18-97 वयोगटातील 24 हजार 419 लोकांनी भाग घेतला होता.
भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे अंतर्गत अभ्यासासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. यासोबतच दोन्ही संस्थांच्या अधिकार्‍यांचाही काही प्रमाणात सहभाग होता. भारतात लवकर मंजुरी मिळण्यावरून निर्माण झालेल्या वादावर मात करण्यासाठी ही आकडेवारी उपयुक्त ठरू शकते, असे बोलले जात आहे. जानेवारीत भारतात कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली. त्या काळात लसीच्या चाचण्यांची अंतिम फेरी पूर्ण व्हायची होती.तेव्हापासून कोव्हॅक्सीनचे कोट्यवधी डोस लोकांना देण्यात आले आहेत. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात या लसीचा आपत्कालीन वापरासाठी यादीत समावेश केला आहे. लॅन्सेटच्या म्हणण्यानुसार, लसीचा दीर्घकालीन परिणाम, परिणामकारकता आणि रोगाविरूद्ध संरक्षण तपासण्यासाठी पुढील तपासणी आवश्यक आहे.

96 देशांनी डब्ल्यूएचओनं मान्यता दिलेल्या लसींना मान्यता दिली आहे. तर काही देशांनी फक्त कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. डब्ल्यूएचओने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.
अरिंदम बाग, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

Exit mobile version