| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडच्या परेश नाका ते मारुती नाका रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. याकडे संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत हे खड्डे बुजविण्याची मागणी केली जात होती. बांधकाम खात्याने त्याची दखल घेत या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.
परेश नाका ते मारुती नाका मुख्य रस्त्यावर तहसीलदार कार्यालय, वनविभाग, सेतू, न्यायालय व पोस्ट इत्यादी महत्वाची कार्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते अधिक जीवघेणे बनले होते. वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून हे खड्डे बुजविण्याची मागणी केली जात होती. अखेर बांधकाम खात्याने दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. परंतु, बुजविण्यात आलेले खड्डे भर पावसात किती दिवस टिकतील, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.







