कोविशील्डचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार

सीरमचा निर्णय
पुणे | प्रतिनिधी |
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी दिली. केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचं उत्पादन कमी केलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले.
उत्पादन कमी केलं जाणार असलं तरी देशाला अचानक मोठ्या प्रमाणात लसीची गरज भासल्यास तेवढा साठा ठेवणार असल्याचं ते म्हणाले. मला आशा आहे की अशी वेळ कधीच येणार नाही, परंतु जर गरज पडली तर पुढचे सहा महिने आम्ही लस देऊ शकत नाही, अशी सांगण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही, असे पूनावाला म्हणाले. तसेच भविष्यात देशातील जनतेसाठी कोणताही धोका न पत्करता आपण स्पुटनिक लाइट लसीचे 20 ते 30 दशलक्ष डोस साठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
कोट
आता असलेल्या लसी ओमीक्रॉनवर परिणामकारक ठरणार नाही, यावर विश्‍वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आपल्याला या विषाणूपासून संरक्षण मिळणार नाही, असंही मानलं जाऊ नये. अ‍ॅस्ट्राझेनाकाची लस विषाणूंविरूद्ध 80% परिणामकारक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

Exit mobile version