रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई चार कोटी 89 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
| अलिबाग | प्रतिनिधी |
अवैधरित्या देशी, विदेशी, दारुची निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल ते 27 डिसेंबर या कालावधीत कारवाई केली. यामध्ये चार कोटी 89 लाख 36 हजार 708 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एक हजार 648 जणांना अटक करण्यात आली असून अवैध धंदे चालविणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गावठी दारुचे अड्डे ठिकठिकाणी आहेत. गावठी दारुमुळे विषबाधा होण्याचा धोका अधिक असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध गावठी दारु विक्री, निर्मिती करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी धंदे सुरु आहेत, त्या ठिकाणी छापे टाकून हे उध्वस्त केले जात आहे. तसेच जिल्ह्यात देशी, विदेशी दारु विक्रीची दुकानेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.
मात्र काही जण बनावट दारु विकणे, जादा किंमत घेणे अशा प्रकारचा गोरख धंदा करीत असल्याने शासनाच्या महसूलावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे या धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत खबऱ्यांद्वारे माहिती घेऊन छापे टाकण्यात आले. एक एप्रिल ते 27 डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये एक हजार 628 गुन्हे दाखल केले आहेत. 101 वाहने जप्त केली आहेत.
या कारवाईने बेकायदेशीररित्या दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काही विक्रेते अनधिकृतपणे दारु विक्री, निर्मिती व वाहतूक करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक बंदोबस्त, नाकाबंदी सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.