प्लास्टिक पिशव्यामुळे पाणी प्रदूषित
| पाली | वार्ताहर |
अंबा नदी सुधागड वासीय व पालीकरांची जीवनदायीनी म्हणून ओळखली जाते. संपुर्ण पाली शहराला अंबा नदितून पाणी पुरवठा होतो. सध्या नदिला पिशवितून टाकलेल्या निर्माल्याच्या कचऱ्याने घेरले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दुषित होत आहे. सध्या मार्गशीर्ष गुरुवार सुरू आहेत. घरात देवपुजेसाठी वापरलेले फुल, हार दुसऱ्या दिवशी शिळे होतात. हे निर्माल्य कुठेही टाकून दिले जात नाही तर ते पाण्यात विसर्जित केले जाते. पालीमध्ये तलाव कमी आहेत, तसेच त्यांचे पाणी खराब आहे. त्यामुळे अनेक जण निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून थेट अंबा नदीत टाकून देतात. प्लॅस्टिकच्या पिशवितील हे निर्माल्य नदी पात्रात तसेच पडून राहते व कुजते आणि पाणी दुषित होते. प्लास्टिकच्या पिशव्या तशाच राहिल्याने त्यामुळेही प्रदूषण वाढते. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात या निर्माल्याच्या पिशव्या वाहून जातात. मात्र पावसाळ्यानंतर अंबा नदीचे पाणी अडविले जाते. आणि मग या निर्माल्याच्या पिशव्या तशाच नदी पत्रात पडून राहतात. पिशवीतील निर्माल्य कुजते व प्लास्टिक पिशवीतून हळूहळू ही घाण बाहेर पडत राहते, आणि पाणी प्रदूषित होते. प्रदूषणामुळे पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंधी येते. पालीकर या पाण्याचा पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी वापर करतात. हे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपंचायत कर्मचारी नियमित जॅकवेल जवळील नदी पत्रातील निर्माल्य व निर्माल्याच्या पिशव्या काढून टाकतात. शिवाय जॅकवेलमध्ये हे निर्माल्य व इतर घाणी जाऊ नये यासाठी तिथे जाळी बसविण्यात आली आहे. निर्माल्य नदीत टाकू नयेत असे फलक देखील लागलीच लावले जातील. तसेच नगरपंचायतच्या माध्यमातून नदीजवळ निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या निर्माल्य कलशात निर्माल्य टाकावे.
–सुधीर भालेराव
पाणीपुरवठा सभापती
नगरपंचायत पाली
अंबा नदीमध्ये थेट प्लास्टिक पिशव्यांमधून निर्माल्य टाकल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यावर्षी पुन्हा विनंती करतो की नागरिकांनी निर्माल्य आपल्या परिसरातील चांगल्या मातीमध्ये खड्डा करुन पुरावे व त्यातून खत निर्मिती करावी. किंवा निर्माल्य कलशात निर्माल्य टाकावे त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन देखील होईल.
-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली