सरप्राईज नाकाबंदी; पनवेल वाहतूक शाखेची धडक कारवाई
| पनवेल | प्रतिनिधी |
विनापरमिट, विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हे रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धट वर्तन करत असून त्यांच्याकडून भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे तसेच, हाफ रिटर्नची मागणी करण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेमार्फत बुधवारी (दि.1) रात्री 10 ते 12 या वेळेत सरप्राईज नाकाबंदी व विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम परिसरात रिक्षाचालकांची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी अवैध प्रवासी वाहतूक, फिटनेस व विमा कालबाह्य, विना परवाना, विना युनिफॉर्म तसेच नियमबाह्य तीव्र प्रकाश असलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 120 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, 30 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. तसेच, 1 रिक्षा जप्त करण्यात आली असून, एका प्रकरणात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकावरही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस हवालदार युवराज येळे, अमीर मुलानी, केशव निकम, संजय ओंबासे तसेच पोलीस शिपाई निलेश ठाकूर, महेश बोरेकर आणि नवीन पनवेल येथील पोलीस मित्र यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, अशा प्रकारच्या धडक मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.
अतिरिक्त बसची व्यवस्था
नाकाबंदीदरम्यान कारवाईच्या भीतीने रिक्षांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने तात्काळ एनएमटी विभागाशी संपर्क साधून अतिरिक्त बसची व्यवस्था केली. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित व वेळेवर प्रवास करता आला. या तत्परतेबद्दल नागरिकांनी वाहतूक शाखेचे कौतुक केले.







