| पेण | प्रतिनिधी |
पेणमधील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई असताना काही जणांकडून सर्रासपणे अनधिकृत पाणी कनेक्शन घेऊन लाखो लिटर पाण्याचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, या गैरप्रकारांविरोधात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता एस.एस. देशमुख यांनी धाडसी पाऊल उचलत थेट कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
भोगावती नदीवरील पुलापासून या तपास मोहिमेची सुरुवात करण्यात आली. दुपारी 2.00 वाजेपर्यंत तब्बल आठ अनधिकृत पाणी कनेक्शन शोधण्यात प्रशासनाला यश आले. त्यामध्ये शिवसागर फूड मॉल, हॉटेल निरव पॅलेस, परिणीती जलशुद्धीकरण, रविराज फार्म हाऊस यांसारख्या व्यावसायिक आस्थापनांचा समावेश असून कैलास घरत, किशोर पाटील आणि शांताराम चवरकर यांच्या नावाचेही अनधिकृत कनेक्शन आढळून आले. विशेष म्हणजे ‘परिणीती जल’ येथे मोठ्या प्रमाणात पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू असून, तेथे एक इंचाचे अनधिकृत कनेक्शन आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे खारेपाट परिसरात नागरिकांना आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागत असताना दुसरीकडे काही जणांकडून चोरीच्या कनेक्शनद्वारे पाण्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, उपअभियंता एस.एस. देशमुख यांनी अनधिकृत कनेक्शनविरोधात मोहीम उघडल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. या कारवाईदरम्यान पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, कनिष्ठ अभियंता सौरभ खांडेकर, किशोर पाटील, गणेश पाटील यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपस्थित होता.







