दरडग्रस्त गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

| खांब | वार्ताहर |

भारतीय भूवैज्ञानिक विभागाने केलेल्या पाहणीत, जिल्ह्यातील गावे 103 दरडप्रवण असल्याचा नोंद केली आहे. यातील 20 गावे संवेदनशील तर 11 अति अतिसंवेदनशील असल्याचे नमूद केले आहे. या संवेदनशील गावांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी, रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न मांडले. या वेळी मौजे मेढा, शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावाचे पुनर्वसन तसेच दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रस्ताव मागवून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. बैठकीला आ. अनिकेत तटकरे, उपसरपंच वरसगाव राकेश शिंदे, पुनवर्सन विभागाचे अधिकारी, तिसे गावाचे उपसरपंच राजेश कदम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. प्राधान्याने हा विषय मार्गी लावला जाईल. त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व महम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

61 आदिवासीवाड्या धोकादायक
जिल्ह्यात 103 गावे दरडप्रवण क्षेत्रामध्ये आहेत. यातील वीस गावातील नागरिकांना भविष्यात दरडीचा सामना करावा लागेल, असा अहवाल भूवैज्ञानिकांनी दिला तर उर्वरित 83 गावांची पाहणी सुरू असल्याचे रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील 61 आदिवासी वाड्या धोकादायक स्थितीत असल्याने त्यांच्याही पुनर्वसनाची मागणी होत आहे.
Exit mobile version