प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्राकडे लक्ष देण्याची मागणी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या भीमाशंकर अभयारण्यमध्ये पदरवाडी ही धनगर लोकांची वस्ती आहे. मात्र त्या वस्तीच्या खालील भागात असलेल्या तालुक्यातील दोन गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. डोंगराला लांबच लांब भेगा पडल्या असून पदरवाडीचे खालील भागातील डोंगर सतत पाऊस सुरू राहिल्यास कोसळण्याची शक्यता आहे. भीमाशंकर अभयारण्यचा काही भाग रायगड तर काही भाग ठाणे आणि मोठा भाग पुणे जिल्ह्यात आहे. या परिसरात डोंगराच्या मध्यभागी पदरवाडी ही धनगर समाजाच्या लोकांची वस्ती आहे. तेथे 10 कुटुंब शेती आणि शेतीवर आधारित उत्पन्नावर उदरनिर्वाह करून राहत आहेत.
इर्षालवाडीची दुर्घटना घडल्यापासून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी भीमाशंकर अभयारण्यमध्ये फिरण्यासाठी गेलेले स्थानिक तरुण यांनी पदरवाडीचे खालील बाजूस डोंगरात पडलेले भेग पाहिली आणि त्यांनतर स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.या डोंगराला 250-300मीटर लांब अशी भेग पडली आहे. पाऊस सुरू असताना हो भेग अनेक ठिकाणी तेथील दगड यांना बाजूला करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जावून डोंगरातील भेग पाहिली असून धोकादायक स्थितीत डोंगर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र पदरवाडी आणि सध्या पडलेली भेग हे पुणे जिल्हा हद्दीत आहे.तर खाली पायथ्याशी असलेली गावे ही रायगड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे प्रशासन त्या धोकादायक भेगांकडे कशा प्रकारे पाहणार याबद्दल स्थानिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
भीमाशंकर अभयारण्यमधून प्रवास करणाऱ्या लोकांकडून, भक्त, ट्रेकर्स यांच्याकडून अभयारण्य विभाग कर वसूल करीत असते. त्यामुळे अभयारण्य विभागाने डोंगरात पडलेल्या भेगा यांचा अभ्यास करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र या भेगामुळे डोंगराचा भाग खाली कोसळली तर गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
सध्या पावसाचा जोर अंत्यत कमी आहे, त्यामुळे धोक्याची स्थिती तेवढी नाही. आमच्या गावापासून तो डोंगर अनेक किलोमिटर लांब आहे. पण इर्षालवाडी दुर्घटना पाहता काही होऊ शकते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने या दरड प्रवण क्षेत्राकडे लक्ष द्यावे.
भाई काठे, माजी उप सरपंच खांडस ग्रामपंचायत