अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर 13 वाहने एकमेकांवर आदळली

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी (दि.27) सकाळी खोपोली एक्झिट जवळ 13 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असून, यामधील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुंबईकडे येणार्‍या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी तातडीने दाखल होत मदतकार्य सुरु केलेले आहे. अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.


एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि 11 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता गाड्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

Exit mobile version