| चिरनेर | वार्ताहर |
तृणधान्यापासून पौष्टिक खाद्यपदार्थांची निर्मिती करून, दैनंदिन आहारात तृणधान्याचा समावेश करा, असे आवाहन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर यांनी शालेय विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना केले.
चिरनेर येथील प्राथमिक केंद्र शाळेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व व गुणधर्म पटवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. यावेळी श्री महागणपती सेंद्रिय शेती गटामार्फत शेतकऱ्यांसाठी चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री पीक विमा, जलयुक्त शिवार अभियान, शेतकरी उत्पादक कंपनी आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तसेच अन्य कृषी विभागाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी पीकविम्या विषयी बोलताना, राज्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सरकार एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरविणार येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शासनाच्या कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या खरीप हंगाम 2023 या स्पर्धेत, उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला कृषी मंडळ अधिकारी किसन शिगवण, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे ,कृषी सहाय्यक अधिकारी सुरज घरत, पोलीस पाटील संजय पाटील, माजी सरपंच संतोष चिरलेकर, कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील तसेच चिरनेर गावातील शेतकरी, शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित होते.
बदललेल्या परिस्थितीमुळे मुलांमध्ये स्थूलता निर्माण झाली आहे. ही स्थूलता कमी करण्यासाठी आपल्या मुलांना तृणधान्यापासून तयार केलेला पौष्टिक आहार दैनंदिन आहारात दिला पाहिजे. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे.
अर्चना सुळ नारनवर, तालुका कृषी अधिकारी







