| वेनगाव | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सावेले ग्रामपंचायत हद्दीतील तांबस येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ऐन पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या कापडाचा किंवा छत्र्यांचा आडोसा करून मृतदेह चितेवर ठेवावा लागत आहे. सदर स्मशानभूमीत शेड, निवारा शेड आणि अन्य सुविधांअभावी अंतविधीसाठी होणारी परवड पाहता मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत.
तांबस गावातील पार्वती विठ्ठल जाधव या महिलेचे नुकतेच निधन झाले होते. दरम्यान, भरपावसात छत्र्यांचा आधार घेत अंतविधी करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी स्मशानभूमीतील गैरसोयीबाबत सावेले ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला. तरी, या स्मशानभूमीवर लवकरात लवकर शेड उभारण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.