| नेरळ । वार्ताहर ।
युवा खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या धर्तीवर मैदान बनवून नेरळमध्ये अकादमी सुरु झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळमध्ये सुरु झालेल्या अकादमीमध्ये बदलापूर ग्रामीण भागातील आणि कर्जत तालुक्यातील 50 हुन अधिक होतकरू युवा खेळाडू क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देता यावे यासाठी जेनी ट्युलिप शाळेच्या मैदानावर 2021 मध्ये कांदळगावकर यांनी क्रीडा अकादमी सुरु केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्या मदतीने मुंबई क्रिकेट अकादमीच्याच्या मान्यतेने खेळपट्टी बनवून घेतली.
बदलापूर ग्रामीण भागातील आणि कर्जत तालुक्यातील साठहून अधिक युवा क्रिकेट खेळाडू यांनी नेरळ स्पोर्ट्स अकादमीमध्ये आपला प्रवेश 2021 मध्ये नक्की करून प्रशिक्षण सुरु केले आहे. दोन तालुक्यातील सहा वर्षांपासून ते 17 वर्षापर्यंत युवक आणि युवती हे २४ नोव्हेंबरपासून अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून नेरळमधील क्रिकेट अकादमीला भारतीय महिला संघाच्या खेळाडू पूनम राऊत यांनी भेट देऊन युवा खेळाडू यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यात या अकादमीमधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शनदेखील मिळणार असल्याने आमच्या शाळेच्या मैदानावरील ही अकादमी आमच्या शाळेमधील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
नम्रता कांदळगावकर, जेनी ट्युलिप स्कूल