सिडकोमध्ये नवीन पदांची निर्मिती

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाकरिता राज्य शासनाने महसुली अधिकारी आणि भूमापन अधिकारी/कर्मचार्‍यांची 22 नवीन पदे निर्माण करण्याकरिता मंजुरी दिली आहे. यामुळे नैना प्रकल्पाशी संबंधित कामे पार पाडण्याकरिता सिडकोकडे स्वत:चे अतिरिक्त आणि समर्पित मनुष्यबळ असणार आहे. यामुळे नैना प्रकल्पाची अंमलबजावणी विहित कालावधीत करणे सुकर होणार आहे.

याकरिता नैना प्रकल्पासाठी महसूल अधिकारी व भूमापन अधिकारी/कर्मचारी यांची नवीन पदे निर्माण करण्याची विनंती सिडकोने शासनाला केली होती. त्यानुसार, दि. 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत नैना प्रकल्पाकरिता एकूण 22 नियमित पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. उप-जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, उप-अधिक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार, निमतादार आणि सर्वेक्षक अशी एकूण 22 पदे नैना प्रकल्पाकरिता निर्माण करण्यात आली आहेत. सदर पदे ही सिडको आस्थापनेवर असणार असून या अधिकारी व कर्मचार्‍यांवर सिडकोचे प्रशासकीय नियंत्रण असणार आहे.

या प्रकल्पाद्वारे राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक अत्याधुनिक शहर विकसित करण्यात येणार आहे. याकरिता नैना प्रकल्पाशी संबंधित महसुली कामे जलद गतीने पार पडावीत म्हणून, सिडकोने केलेल्या विनंतीचा विचार करून शासनाने या प्रकल्पाकरिता 22 नवीन पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नैना प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने होईल, याबद्दल कोणतीही शंका नाही.

-डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको



Exit mobile version