पतसंस्थांनी आर्थिक शिस्त पाळली पाहिजे- डॉ. जोशी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पतसंस्थांना शासनातर्फे विमा ठेव संरक्षण नसतानाही देशात 1 लाख 10 हजार सहकारी पतसंस्था कार्यरत असून, 29 कोटी सभासदांमार्फत 110 लाख कोटी इतक्या ठेवी जमा झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 25 टक्के लोकसंख्या सहकार क्षेत्राशी जोडली गेली असून, 70 टक्के लोकांचे केवायसी पूर्ण झाले आहे. तथापि, मूठभर संस्थांमध्ये गैरव्यवहार, आर्थिक फसणुकीचे प्रकार झाल्याने पतसंस्थांची प्रतिमा मलीन झाली आहे. सहकार क्षेत्र उन्नत झाले पाहिजे. दलित, आर्थिक दुर्बल, असंघटित लोकांसाठी सहकार चळवळीतूनच आर्थिक प्रगती शक्य आहे. सहकार क्षेत्राला अधिकाधिक स्थैर्य लाभावे यासाठी पतसंस्थांनी आर्थिक शिस्त डोळ्यात तेल घालून पाळली पाहिजे, असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी यांनी सभासद मेळाव्यात केले. मुरुड येथील जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या 29 व्या वर्धापनदिनी सभासदांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. जोशी बोलत होते.

आपल्या भाषणात ते म्हणाले की, पतसंस्थेची इभ्रत, समाजातील विश्‍वासार्हतेला तडा जाणार नाही असे व्यवहार केले पाहिजेत असा सल्ला देत सभासदांना आर्थिक साक्षरता प्राप्त करण्यासाठी काही कानमंत्रही दिले. नफा-तोटा पत्रकातील फार ज्ञान नसले तरी संस्थेचा सीडी रेशो 70 टक्के, भांडवल पर्याप्तता, सीआरएआर 110 टक्के, ग्रॉस एनपीए 15 टक्के तर नेट एनपीए 5 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये याकडे सभासदांसह संचालकांचे लक्ष वेधत संस्थेच्या व्याजदरापेक्षा 1 ते दीड टक्का अधिक लाभांश वितरित करणार्‍या संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे समजावे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सभासदांना दिली.
यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघ सचिव योगेश मगर, जयश्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी, उपाध्यक्ष प्रा. मेघराज जाधव, सचिव सुनील विरकुड, कोषाध्यक्ष बाळकृष्ण कासार, सहयोग पतसंस्थेचे संचालक निळकंठ खेमकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार दिलीप यादव, संचालक गणेश ठोसर, सिध्देश गद्रे, डॉ. संजय पाटील, प्रमोद उपाध्ये, अश्‍विनी पाटील, डॉ. अमित बेनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील विरकुड यांनी, तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण कासार यांनी केले.

Exit mobile version