मृत्यूनंतरही सोसवेनात नरक यातना

छत्र्यांच्या आधाराने सरणावर लाकडे

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मृत्यूनंतरही सोसवेनात नरक यातना, छत्र्यांच्या आधारावर चढवली जातात सरणावर लाकडे.. एखाद्या कवितेमधील विदारक वर्णन शोभावे असे वास्तव सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत मधील बौद्धवाडी स्मशानभूमीमध्ये पहावयास मिळत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला आजही नागरिकांना मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायतीमधील बौद्धवाडी स्मशानभूमीला सन 2018/19 या वर्षी 14 व्या वित्त आयोगाच्या फंडातून 1,72,000/- रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना आजही त्या स्मशान भूमीवर शेड उभी राहिलेली नाही ही शोकांतिका असून शासनासाठी लाजीरवाणी बाब आहे. नुकतेच चंदरगावं येथील सटवाजी यादव यांचे निधन झाले. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे? असा प्रश्न नातेवाईकांना पडला होता. पाऊसही कमी होत नसल्यामुळे स्मशानात मृतदेह ठेवून वर छत्र्यांचा आधार घेत सरणावर लाकडे ठेवावी लागली. अशी मृतदेहाची अवहेलना किती वेळ करायची, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. स्मशानभूमीत शेड आणि अन्य सुविधांआभावी अंत्यविधीसाठी होणारी परवड पाहता मृत्यूनतंरही सुटका नाही, असेच म्हणावे लागेल.

चंदरगाव बौद्धवाडीतील स्मशानभूमीवर पत्र्याचे शेड नसल्यामुळे भरपावासात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परंतु याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पुढारी लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Exit mobile version