चिपळूण नागरी पतसंस्थेच्या शाखातंर्गत क्रिकेट स्पर्धा

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. या पन्नास शाखांमध्ये जवळपास 245 हुन अधिक कर्मचारी व 68 हुन अधिक अल्पबचत प्रतिनिधी, 49 सराफ व 750 समन्वयक कार्यरत असून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणारा कर्मचारी वर्ग म्हणून या संस्थेच्या कर्मचार्‍यांचा नाव लौकिक आहे. कर्मचार्‍यांना प्रोत्साहीत करण्यासाठी सांघीक पद्धतीने क्रीडा स्पर्धात सामिल होऊन जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असते. शनिवार (दि.30) व रविवार (दि.1) या कालावधीत संस्थेच्या सात विभागाच्या शाखांतर्गत कर्मचार्‍यांच्या आठ संघामध्ये क्रिकेट स्पर्धांचे तसेच कर्मचारी संघ विरुद्ध संचालक मंडळ संघ अशा लक्षवेधी सामन्याचे आयोजन करणेत आले आहे.

या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटूंना व क्रिकेटची आवड असणार्‍या क्रीडा रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल. या स्पर्धा चिपळूण नगरपालीकेच्या पवन तलावावरील स्टेडिअमवर संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार असुन रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहेत. विजेत्या संघाला व उपविजेता संघाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास क्रीडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

Exit mobile version