| रायगड | प्रतिनिधी |
एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होत असताना रायगड जिल्ह्यात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. आवडत्या क्रिकेटपटुंचे मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कुस्ती, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट यांसह सर्व प्रकारच्या खेळांचे दर्दी आणि खेळाडू हे घरोघरी आढळतात. अंतिम सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह आवडत्या खेळाडूंचे क्रिकेट खेळाचे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यात हॉटेल्स, रिसॉर्ट येथे खास व्यवस्था करण्यात आली होती.
अलिबाग शहरात असणाऱ्या क्रीडाभवन येथे मोठ्या पडद्यावर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. या पडद्यावर सामना पाहण्यासाठी अलिबागकारांसह पर्यटकांनी हजेरी लावली. भारतीय संघाने विजय मिळवावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यासाठी मोठ्या पैजा लागल्या आहेत. तर कोणता संघ जिंकणार यासाठी बेटिंग तेजीत असून खिशाला कात्री लावण्याचे कामही सुरु असून भारतीय संघ जिंकण्याकडे कल दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गणवेश असलेल्या निळ्या जर्सीचा दरही वधारला आहे. 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतची जर्सी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे. अनेक क्रिकेट संघ, तालीम संघ, तरुण मंडळ यांनी अंतिम सामना प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्रित पाहण्याची जय्यत तयारी केली होती. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात देखील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचाज्वर पाहायला मिळाला. रस्ते आणि बाजारपेठांमध्ये दुपारी एक वाजल्यानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजारपेठामंधील दुकाने बंद करून सामना पाहण्याचा आनंद दुकानदार देखील लुटत आहेत.