I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
रायगड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या क्रिकेट, कबड्डी सारख्या क्रीडा प्रकारावर देखील निर्बंध लादत गावोगावी होणारे सामने /स्पर्धा बंद ठेवावेत अन्यथा आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक के डी कोल्हे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांना त्यांनी कळविले आहे की, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावोगावी होत असलेले क्रिकेट व कबड्डी चे सामने रद्द करावे. पोलीस स्टेशन कडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही सामन्यांचे आयोजन केले तर आयोजकांवर कारवाई केली जाईल.