भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचा अंतिम फेरीत प्रवेश
| क्रीडा प्रतिनिधी | रायगड |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत, भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात एजे स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी संघावर 48 धावांनी दिमाखदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भेंडखळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करतांना 39.5 षटकात 10 गडी गमावत 181 धावा फलकावर नोंदवल्या त्यामध्ये दक्ष पाटील यांनी सर्वाधिक 51 श्लोक कोळी 42 तर जिदनेश म्हात्रे यांनी बहुमूल्य 28 धावा काढून संघाला योगदान दिले. एजे स्पोर्ट्सकडून साईराज जोशी, श्लोक साळुंके, अंश यादव यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देताना एजे स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा डाव 36.2 षटकात सर्व गडी बाद 133 ह्या धावसंखेवर आटोपला. प्रणित उलवेकर यांनी सर्वाधिक 47 तर मिलन चौरसिया यांनी 27 धावा संघासाठी काढल्या. भेंडखळ संघाकडून तृषभ गावंड व अभिषेक वर्मा यांनी प्रत्येकी 3 तर विघ्नेश पाटील व जिदनेश म्हात्रे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद करत संघाला 48 धावांनी दिमाखदार विजय मिळवून देत स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रवेश निश्चित केला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक जावेद खान, हझीक नदीम, शरद म्हात्रे भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाचे अध्यक्ष संदिप पाटील सचिव मनोज भगत यांनी खेळाडूंनी मैदानावर केलेल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत अंतिम सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.







