क्रिकेटपटू जोश बेकर याचे निधन

| लंडन | वृत्तसंस्था |

इंग्लंड क्रिकेटसाठी हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जोश बेकर या प्रतिभावान क्रिकेटपटूचे 2 मे रोजी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी निधन झाले. जोश डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचा. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तो वूस्टरशायर क्रिकेट क्लबकडून खेळायचा. 1 मे रोजी त्याने एका सामन्यात 3 बळी घेतले होते. इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सशीही त्याचे विशेष नाते होते.

वूस्टरशायर क्लबने जोश बेकरच्या मृत्यूवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. बेकरच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे, असे क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या निधनाने क्लबला धक्का बसला आहे, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अ‍ॅशले गिल्स यांनी सांगितले. गिल्स म्हणाले, जोश यांच्या निधनाच्या बातमीने आम्हाला धक्का बसला आहे. जोश हा एक सहकारी होता, तो आमच्या क्रिकेट कुटुंबाचा अविभाज्य भाग होता, आम्ही सर्व त्याची खूप आठवण काढू.

बेकरने 2021 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी क्लबसोबत पहिला करार केला. त्याने 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 विकेट्स आणि 25 पांढर्‍या चेंडू सामन्यांमध्ये 27 बळी घेतले. जोश बेकर हा एक उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू होता, त्याने जुलै 2023 मध्ये ग्लुसेस्टरशायरविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम 75 धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावली. तो इंग्लंडच्या अंडर-19 संघाकडूनही खेळला आहे. बुधवार (1 मे) रोजीच, ब्रॉम्सग्रोव्ह स्कूलमध्ये सॉमरसेट विरुद्ध वूस्टरशायरच्या चार दिवसीय दुसर्‍या चॅम्पियनशिप सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 66 धावांत 3 बळी घेतले. मात्र, अंतिम दिवशी सामना लवकर रद्द करण्यात आला. तथापि, बेकर 2022 मध्ये प्रकाशझोतात आला, जेव्हा बेन स्टोक्सने त्याच्या एका षटकात 34 धावा दिल्या. त्यानंतर स्टोक्सने त्याच्या षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावला. मात्र, नंतर स्टोक्सने त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून प्रोत्साहन दिले.

Exit mobile version