। पेण । वार्ताहार ।
पेण येथील इंग्रजी माध्यमची शाळा म्हणून प्रचलीत असलेली पेण शिक्षण महिला समितीच्या गुरूकुल शाळेमध्ये 2015 पासून बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकाराची पायमल्ली झाली असून 2015 पासून या नियमानुसार 25 टक्के मुलांना फीमध्ये सवलत देणे अपेक्षित होते. मात्र ती सवलत दिली नसून त्यांच्याकडून फी आकारण्यात आली होती. मात्र ज्या वेळेला पालकांकडून उठाव करण्यात आले, त्यावेही या शिक्षण संस्थेचे पितळ उघडे पडले.
बालकांचा मोफत व सक्तींच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचा अधिकार आहे. ज्या खासगी शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थामध्ये 25 टक्के मुलांना मोफत शिक्षण देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र या संस्थेत 2015 पासून ज्या मुलांना आर.टी.ई नुसार सवलत मिळाली आहे. त्या मुलांना सवलत न देता त्यांची फी आकारून घेतली गेली आहे. नियमानुसार या 25 टक्के मुलांना मोफत शिक्षण देणे क्रमप्राप्त असताना पालकांच्या अज्ञानपणाचा फायदा घेउन या शिक्षण संस्थेने पालकांची फसवणूक केली.
ही बाब पालकांच्या लक्षात लक्षात येताच त्यांनी आवाज उठवला व आर.टी.ई नियम या संस्थेत लागू केले जात नाही. हे शिक्षण प्रशासकाच्या ध्यानात आणून दिले. त्या वेळेला संस्थेने आपली चूक कबूल करत विदयार्थ्यांचे पैसे परत देण्यास सुरूवात केली. महत्वाची बाब म्हणजे 2015 ते 2022 चा विचार करता गेली 7 वर्ष या संस्थेने पालकांना अंधारात ठेऊन फसवणूक केली आहे.
पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात पालक, प्रतिनिधी, गटशिक्षण अधिकारी अरुणादेवी मोरे, पुरूषोत्तम म्हात्रे, निलेश मनकावळे, यांच्या समवेत शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराबाबत व बळजबरीने विदयार्थ्यांच्या माथ्यावर खासगी लिड अॅप मारत असल्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पालकांची इच्छा नसताना शिक्षण संस्था पालकांवर दबाव तंत्राचा वापर करून लिड अॅप देण्याचा प्रयत्न करत आहेत.
पी.एस.एम.एस म्हणजेच गुरूकुल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती भराटे यांना शाळेचा दुरध्वनी क्रमांक 7040240724 वर संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता टेलीफोनचे बिल न भरल्यामुळे इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे. अशा प्रकारची रेकॉडींग ऐकायला मिळाली. त्यामुळे मुख्याध्यापिकांना संपर्क होऊ शकला नाही.