आरोपी आणि फिर्यादी पुणे जिल्ह्यातील
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील काळकाई ढाबा हॉटेल येथे 24 मे 2024 रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या घटनेमध्ये जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी आणि फिर्यादी दोघे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असून, 2 जून रोजी घटनेबाबत अर्ज प्राप्त झाला. यानंतर पोलीस ठाण्याची सीसीएनएस प्रणाली सुरू झाल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासात वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
काळकाई ढाबा हॉटेल येथे 24 मे रोजी रात्री 11वाजता घडलेल्या घटनेमध्ये फिर्यादी मिलींद सुनील साबळे (रा.वालचंदनगर, ता. इंदापूर, जि.पुणे) यास तो कोणत्या समाजाचा आहे, हे माहिती असूनही जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी संदीप उर्फ बाबू पवार (रा. बारामती, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान आरोपीने फिर्यादीला हाताबुक्क्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली व महापुरूषांच्याबाबत अपशब्द वापरून भावना दुखावल्याने पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी तपास केला. याप्रकरणी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे तपासिक अंमलदार म्हणून काम करीत आहेत.