देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा

माणगाव | वार्ताहर |
कोव्हिड संसर्गजन्य विषाणूच्या संकटामुळे देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी जाण्याकरिता शासनाने मनाई आदेश असतानाही येथे जवळपास 50 ते 100 पर्यटकांना फिरण्यास घेऊन जाणार्‍या नऊ आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा शनिवार, दि.3 जुलै रोजी दुपारी 1 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पाटणुस गावच्या हद्दीत देवकुंड धबधबा येथे घडला. याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्यामसुंदर हनुमंतराव शिंदे (33) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी संतोष हरिश्‍चंद्र गुजर, सुखानंद कुलकर्णी, करण म्हामुणकर, प्रभात म्हामुणकर, नवनाथ पिसाळ, सुरेश दळवी, राजेश सावंत, शिवम मोरे, सुभाष येरुणकर, सर्व रा. पाटणूस, ता. माणगाव यांनी 50 ते 100 पर्यटकांना देवकुंड धबधबा बघण्यासाठी बुकिंग घेऊन त्यांना देवकुंड धबधबा येथे फिरण्यासाठी नेले. याठिकाणी फिरण्यास बंदी असल्याने याप्रकरणी वरील आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदर श्री. वडते हे करीत आहेत.

Exit mobile version