सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंडसह कुंभेलाही मनाई
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा, सणसवाडीतील सिक्रेट पॉईंट, ताम्हाणी घाट व आजूबाजूच्या एक कि.मी. परिसरात जाण्यास यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, कुंभे येथील दरीत पाय घसरुन पडल्याने मुंबईतील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, याठिकाणीसुद्धा प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत 144 कलमाचे लॉक लावले आहे. त्यामुळे वर्षासहलीसाठी येणार्या पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून माणगाव उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, ताम्हाणी घाट व आजूबाजूचा 1 कि.मी. परिसर आणि त्यानंतर आता कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरात दि. 16 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत 144 कलमाचे लॉक लावले आहे. वास्तविक देवकुंड, ताम्हिणी घाट व सिक्रेट पॉईंट येथील धबधबा व परिसरात पर्यटकांना बंदी ज्या दिवशी घातली होती, त्या दिवशी कुंभे जलविद्युत प्रकल्पच्या परिसरात बंदी घालण्याची गरज होती. या दुर्घटनेपूर्वी परिसरात बंदी घातली असती, तर या युवतीचा प्राण वाचला असता, अशी पर्यटकांतून चर्चा आहे.
रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील देवकुंड धबधबा व सणसवाडी गावचे हद्दीतील सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट येथे 144 कलम लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. सदरचा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन 2017 चे पावसाळी हंगामात सदर ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील 4 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्युमुखी पडले होते. तसेच सुमारे 55 पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीचे पात्राचे ठिकाणी अडकले होते. सन 2018 चे पावसाळी हंगामातदेखील फौजदारी प्रक्रिया, संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशाची मुदत संपल्यानंतर 3 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते व मृत्युमुखी पडले होते.
सन 2022 मध्ये एक पर्यटक नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मयत झालेला आहे. त्याचबरोबर सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हीणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जिवीत हानी होऊ शकते. या कारणांमुळे देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट ही पर्यटन स्थळे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने या ठिकाणी कलम 144 लागू केला आहे.