‘बोल्ड विंग’ संस्थेविरोधात संताप
| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त युवकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल आ. रोहित पवार यांनी घेत सिडको प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. एअरपोर्ट ट्रेनिंग, जॉब गॅरंटी आणि प्लेसमेंटच्या नावाखाली बेरोजगार युवकांकडून हजारो ते लाखो रुपये उकळल्याचा आरोप आ. पवार यांनी ‘बोल्ड विंग’ या खासगी प्रशिक्षण संस्थेवर केला आहे.
उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्त युवकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. प्रशिक्षणासाठी मोठी रक्कम भरूनही नोकरी न मिळाल्याने युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे स्थानिक युवक जय मधुकर पाटील यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, विमानतळावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत संबंधित संस्थेने त्यांच्याकडून तब्बल 88 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे भरूनही कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्त युवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जमिनी आमच्या गेल्या, रोजगाराचे आश्वासन सरकारने दिले आणि आता नोकरीच्या नावाखाली आमचीच लूट सुरू झाली,” अशी भावना व्यक्त केली.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगारात प्राधान्य मिळणे हा त्यांचा नैतिक आणि कायदेशीर हक्क आहे. मात्र, काही खासगी संस्था आणि दलाल बेरोजगारांच्या भावनांशी खेळत असल्याचे चित्र समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली असून, संबंधित संस्थेकडे अधिकृत परवानगी आहे का, युवकांकडून उकळलेले पैसे कुठे गेले आणि या प्रकाराला कोणाचे संरक्षण आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक युवकांनी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची स्वप्ने विकणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






