वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दोन वर्षांच्या आरंशचा दुर्दैवी मृत्यू
| चौल | प्रतिनिधी |
पोटच्या गोळ्याचा श्वास अडकल्याचे पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला… मुलाचा जीव वाचविण्यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केले. कधी त्याला खांद्यावर घेत धावली, तर कधी रस्त्यात दिसेल त्या वाहनाला हात करून मदतीची याचना केली. मात्र, बेलकडे ते कुरुळदरम्यानच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीत तिची धडपड अडकली. अखेर जिल्हा रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी दोन वर्षांच्या आरंश सुशील ठाकूर याला मृत घोषित केले. अलिबाग तालुक्यातील बामणगाव-खारीकपाडा येथे सोमवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
दुपारी दोनच्या सुमारास आरंश घरी फुग्याबरोबर खेळत होता. खेळता खेळता त्याने अचानक फुगा गिळला आणि त्याचा श्वास अडकू लागला. ही बाब लक्षात येताच आई-वडिलांनी फुगा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आरंशला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्यासमोर उभी होती ती बेलकडे ते कुरुळदरम्यानची प्रचंड वाहतूक कोंडी!
रस्त्याच्या कामामुळे आधीच वाहने अडकून पडली होती. पुढे जाण्याचा मार्गच मिळत नव्हता. इकडे आरंशचा श्वास कोंडत होता आणि तिकडे वाहतूक मात्र जागची हलत नव्हती. मुलाला वाचविण्यासाठी आईने अखेर त्याला खांद्यावर घेत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. वाटेत मिळेल त्या वाहनाला हात दाखवत मदतीसाठी आर्त हाक दिली. मात्र, काळाने तिची ही धडपडही अपुरी ठरवली. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी आरंशला मृत घोषित केले.
मृतदेह घरी नेतानाही कोंडीचा अडथळा
या घटनेनंतरही वाहतूक कोंडीने कुटुंबियांची पाठ सोडली नाही. चिमुकल्या आरंशचा मृतदेह घरी नेतानाही कोंडीत अडकावे लागले. त्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनास जाग येणार कधी?
एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जागी होणार का? आरंशला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. एका आईची आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठीची आर्त धडपड आणि अखेर पदरी आलेले दुःख यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.






