राजकीय वादातून एकमेकांविरोधात गुन्हे

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| महाड | प्रतिनिधी |

महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या दिवशी शहरातील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या राड्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्पराविरोधी तक्रारी दाखल झाल्याचे समोर आले आहे. पहिली तक्रार सुशांत गणेश जाबरे (रा. टोळ) यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली. यात विकास भरत गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय व वैभव मालुसरे, सूरज मालुसरे (रा. ढालकाठी), सिद्धेश शेठ (रा. पोलादपूर) तसेच आणखी दहा अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

जाबरे यांच्या मते, मतदान प्रक्रियेचा आढावा घेत असताना प्रतिस्पर्धी गटाकडून त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना तसेच अंगरक्षकाला मारहाण झाली. अंगरक्षकाची बंदूक हिसकावून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय दोन वाहनांच्या काचा फोडणे, एका कार्यकर्त्याची सोन्याची चैन आणि चार मोबाईल चोरीला गेल्याचा उल्लेखही फिर्यादीत आहे.

तर याउलट दूसरी फिर्याद महेश निवृत्ती गोगावले (39), रा. पिंपळवाडी यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून हनुमंत व श्रीयश जगताप, धनंजय (बंटी) देशमुख, जगदीश पवार, निलेश महाडिक, अमित शिगवण, व्यंकट मंडाला, गोपालसिंग, मंजीतसिंग अरोरा, मोनीश पाल, समीर रेवाळे आणि आणखी दहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोगावले यांनी केलेल्या आरोपांनुसार, प्रतिस्पर्ध्यांनी जमाव तयार करत स्वतःवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गोपालसिंग यांनी बंदूक रोखून धमकी दिली आणि इतरांनी काठ्या व हॉकीस्टिकने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. तसेच विजय मालुसरे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची चैन हिसकावून चोरी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी  गुन्हे नोंदवले असून ही घटना एकाच वेळची असल्याने तक्रारी महाड शहर पोलीस ठाण्यात एकत्रित तपासासाठी वर्ग करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version