| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर शनिवारी दुपारी 1 वाजता शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
या घटनेनंतर, मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा जाब विचारला. येत्या शनिवारपर्यंत आरोपींना अटक न केल्यास सोमवारी महाड बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर सामाजिक संस्था सहभागी होतील, असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांनी महाडमध्ये एका घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी ‘बंद’ पुकारल्याचे जाहीर केले. त्यांनी महाडमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अविनाश जाधव यांनी महाड पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देण्यापूर्वी अविनाश जाधव यांनी पंकज उमासरे यांच्या दुकानाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी संजय नाईक, योगेश चिले, चेतन उतेकर, तसेच उबाठाचे चेतन पोटफोडे शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस ठाण्यात पंकज उमासरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या महाडमधील विविध कार्यक्रमांमधील सहभागाचे छायाचित्र पोलिसांना दाखवले. मनसेने लेखी पत्राद्वारे या गुन्ह्याप्रकरणी विकास गोगावले यांना 109 कलमांतर्गत अटक करण्याची मागणी केली आहे. ही घटना महाड शहर पोलीस ठाण्यामधील उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्यासमोरच घडली.






