हात चलाखीने दागिने लुटणारा गुन्हेगार जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।
आपल्या संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांचे दागिने लुटणार्‍या एका सराईत भामट्याला गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली आहे. किरण रमणिकलाल शहा (40) असे या सराईत भामट्याचे नाव असून त्याने 125 पेक्षा अधिक लोकांची फसवणुक करुन त्यांचे दागिने लुटल्याचे उघडकिस आले आहे. या आरोपीकडून 88 ग्रॅम वजनाचे 2 लाख 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. या कारवाईत अटक करण्यात आलेला किरण शहा हा आरोपी अंगावर सोन्याचे दागिने असलेल्या लोकांना लक्ष्य करुन, तुम्ही एका महिलेला हात लावला आहे, तुम्ही गर्भवती महिलेला मोटार सायकलवरुन कट मारला आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तो आपल्या संभाषण चतुराईने बोलण्यात गुंतवायचा. त्यानंतर तो सदर महिलेला तुमच्या गळयातील चैन अथवा हातातील अंगठी दाखवून, तुम्ही ती व्यक्ती आहे किंवा नाही याची खात्री करुन येतो, अशी बतावणी करुन त्यांना दागिने देण्यास भाग पाडायचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने तुर्भे रेल्वे स्टेशन जवळ सापळा लावून आरोपी किरण शहा याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखी करुन रबाळे, तुर्भे, कोपरखैरणे व मुंबईतील पवई भागात केलेले फसवणुकिचे गुन्हे उघडकीस आले.

Exit mobile version