तिघांना अटक
। पुणे । प्रतिनिधी ।
तळेगावच्या सोमाटणे फाटा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तरादाखल कारवाई करत आरोपींना शरण येण्यास भाग पाडले. घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडून दोन पिस्तुले तसेच घरफोडीमध्ये चोरी केलेले महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखा युनिट–2 चे अधिकारी आणि कर्मचारी हे घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करत होते. त्याचदरम्यान आरोपींनी पोलिसांवर पिस्तूलातून एक गोळी झाडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, पकडलेले तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी, मारहाण अशा विविध गंभीर प्रकरणांची नोंद आहे. त्यापैकी एक आरोपी हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) वॉंटेड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिक धाडसी आणि महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
