। नागपूर । वृतसंस्था ।
विदर्भात तापमानाचा पारा वाढतच असला तरी राज्यावर मात्र, पुन्हा एकदा आस्मानी संकटाचे वारे घोंगावत आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यातच आज आस्मानी संकट गडद होणार आहे. विदर्भात अवकाळी पाऊस तर कोकण परिसरात वादळी वार्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळेच राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आस्मानी संकट पुन्हा एकदा परत आले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सोमवारी, 14 एप्रिलला राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला. महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचे असणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये एकाचवेळी पाऊस, उष्णता आणि दमटपणा यांचा अनुभव येईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात वादळी वारे 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर कोरड्या हवामानसह वादळी वार्यांची देखील शक्यता आहे. पण काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरसारख्या शहरांमध्ये तापमान 32-35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवू शकतो. पुणे, नाशिक आणि सातारा यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये तापमान 36-39 अंशांपर्यंत जाऊ शकते, पण संध्याकाळी पावसामुळे थोडासा गारवा राहण्याची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, अमरावती आणि अकोला येथे पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना येथे पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे, कारण किनारपट्टीवर वार्याचा वेग वाढू शकतो. नागरिकांना विजेपासून सावध राहण्याचा आणि घराबाहेर पडताना छत्री बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी होऊन तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.