पावसाच्या अनियमितने दुबार पेरण्यांचे संकट

कर्जत परिसरातील शेतकरी हवालदिल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात भातशेती हे अर्ध्याहून अधिक जनतेचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे.यावर्षी भाताची शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसामुळे मोठे धक्के दिले आहेत. सलग पाऊस आणि पावसाने अचानक घेतलेल्या गतीमुळे भाताच्या शेतीची रोपे शेतातच कुजून जाण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, दुबार पेरण्या शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत,मात्र ते भाताचे रोप देखील जगण्याच्या स्थितीत नसल्याने बळीराजा संकटात आहे.

तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते.खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामात देखील तालुक्यातील शेतकरी भाताची शेती पाणी असलेल्या भागात करीत असतात. मात्र खरीप हंगामात भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी 22 जून रोजी पाऊस आला आणि त्यानंतर पाऊस जोर धऱणायच्या मार्गावर असताना शेतकरी भाताची पेरणी करण्यात मश्गुल होते. खरेतर सुरुवातीचा पाऊस ये जा करीत असतो, मात्र यावर्षी पावसाने सुरु केलेली बॅटिंग थांबायचे नाव घेत नव्हती. सलग 15 दिवस कोसळ्यानंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. त्याचा परिणाम शेतात भाताची रोपे तयार करण्यासाठी टाकलेले भाताचे बी उगवले नाही आणि शेतकरी दुबार पेरणीच्या मागे लागले. तालुक्यातील असंख्य शेतकरी यांनी जून अखेर पर्यंत दुबार पेरण्या केल्या आहेत.

दुसरीकड़े पाऊस थांबत नसल्याने भाताची दुसऱ्यांदा केलेली पेरणी देखील अनेक ठिकाणी वाया गेली आहे.पाऊस न थांबल्याने आणि सतत बरसत राहिल्याने भाताची रोप अनेक ठिकाणी उगवली नाहीत आणि त्यामुळे यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी भाताची लावणी सुरु झाली नाही. अनेक शेतकऱ्यांची दुसरी दुबार पेरणी फुकट गेली आहे आणि त्यामुळे भाताची रोपे कशी तयार करायची या संकटात बळीराज आहे.त्याचे कारण शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार करण्यासाठी राखून ठेवलेला भात बियाणे हि संपली आहेत. त्याचवेळी खरीप हंगामात शेतकरी हे 125 ते 135 दिवसांचे उत्पन्न देणारे भाताची शेती करीत असतात. त्यामुळे आता जुलै महिना सुरु झाला असल्याने पावसाचे नियोजन बघता कोणत्या जातीच्या भाताची निवड करायची आणि भाताची शेती मधून भाताचे उत्पादन घ्यायचे या संभ्रमात शेतकरी आहेत.

आम्ही दुसऱ्यांदा भाताची पेरणी केली आहे,पण कुठेतरी एखाद ठिकाणी भाताचे रोप जमिनीवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी शेतातून पीक कसे निघणार आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार याबाबत आम्ही आणि आमच्या भागातील शेतकरी संभ्रमात आहेत.

कृष्णा शिंगोळे – शेतकरी,चई

पावसाने आमच्या डोळ्यात अश्रू आणले असून भाताची दुबार पेरणी करून देखील रोपे तयार झालेले नाहीत. त्यामुळे आम्हाला यावर्षी जमिनी ओसाड सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संदीप मसने – शेतकरी तळवडे

पावसामुळे बळीराज संकटात आला आहे,एकदा नाही तर दुसऱ्यांदा भाताचे पेरणी केली होती,पण सलग पावसाने भाताची रोपे जमिनीतच कुजून गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 दिवसात भाताचे पीक देणाऱ्या वाणाची निवड करावी आणि भाताची शेती मधून कमी दिवसात चांगले उत्पादन मिळू शकेल .

रामदास तुपे- श्री समर्थ ऍग्रो
Exit mobile version