ग्रामीण आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग सध्या गंभीर मनुष्यबळ टंचाईचा सामना करत असून, पूर्णवेळ जिल्हा आरोग्य अधिकारी नसणे आणि अनेक तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी पदे रिक्त असणे, ही चिंताजनक बाब ठरली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे ही पदे दीर्घकाळ भरली जात नसल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर थेट परिणाम होत असून, निर्णयक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावाचा फटका थेट रुग्णांना बसत आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या तब्बल 16 लाख 64 हजार असून, सुमारे 1,800 हून अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. या विस्तीर्ण ग्रामीण भागाला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 56 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 280 उपकेंद्रे कार्यरत आहेत. वाढते औद्योगिकीकरण आणि त्यातून वाढलेले नागरिकीकरण यामुळे आरोग्य सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळ अपुरे असल्याने कार्यरत आरोग्य अधिकारी व सेवकांना तारेवरची कसरत करत सेवा द्यावी लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये एकूण 558 पदे रिक्त असून, त्यात 482 पदे पुरुष व महिला आरोग्य सेवकांची आहेत. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कमकुवत होत चालल्याची भीती व्यक्त होत आहे. गावांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांना तालुका व जिल्हा मुख्यालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा विखे यांच्यानंतर या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही. सध्या कुष्ठरोग विभागाच्या डॉ. प्राची नेहूलकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून, प्रभारी व्यवस्थेवरच जिल्ह्याचा आरोग्य कारभार सुरू आहे. तालुका स्तरावरही परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी केवळ 11 तालुक्यांत तालुका आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. पोलादपूर, महाड, तळा आणि मुरूड या तालुक्यांमध्ये ही पदे अद्याप रिक्त आहेत. पूर्णवेळ तालुका अधिकारी नसल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणा अक्षरशः आजारी पडल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर स्थितीकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
441 पदे रिक्त
जिल्हा परिषद आरोग्य विभागात आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला व पुरुष) आणि प्रशिक्षित दायी अशी एकूण 441 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या 624 कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण पडत असून, त्याचा परिणाम सेवा गुणवत्तेवर होत आहे. ग्रामीण नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.





