फळ बागायतदारांवर अस्मानीचे संकट

अवकाळी पावसामुळे फळ बागा धोक्यात
कोकणी पिकांवर घातक परिणामांची शक्यता

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू, कोकम, सुपारी अशा विविध कोकणी पिकांसाठी प्रसिद्ध असून, सद्यःस्थितीत कोकणातील फळ बागायतदारांवर अस्मानीचे संकट घोंघावत आहे. अस्मानीच्या अवकाळातील अवकृपेमुळे कोकणी पिकांवर घातक परिणामांची शक्यता निर्माण झाली असून, फळबागायतदार चिंताग्रस्त झाल्याचे चित्र समोर येत आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आणि वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक नुकसानीचा फटका सहन करणार्‍या कोकणी बळीराजाला आर्थिक संकटाची झळ पुन्हा एकदा बसणार असल्याची द्वाहीच दिली गेली.
जागतिक तापमान वाढ या विषयावरील जागतिक परिषदेत भविष्यात तापमान वाढीचा फटका किनारपट्टीच्या भागांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. निसर्गानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत, एकाकी तापमान वृद्धी, अवकाळी वर्षा, गारपीट आदींची भेट देण्याची मालिका सुरू केली आहे. पण यामुळे बळीराजाच्या पदरी निराशेचे निखारे पडत आहेत.
या बदलत्या वातावरणाने आतापर्यंत उपजिविका आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारी या फळबागांचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. त्यामुळे या बागांवर अवलंबुन असलेल्या बागायतदारांचे अर्थकारण बिघडताना दिसत आहे.
कोकणात अधिकत्तर लोकांचे अर्थकारण आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम या पिकांवर आहे; परंतु ही पिकेच बदलत्या वातावरणामुळे अडचणीत येताना दिसत आहेत. सर्वाधिक लागवडक्षेत्र असलेला काजू आणि आंबा ही पिके सतत धोक्यात येत आहेत. गेल्यावर्षी आंबा, काजू पिकांचे अवकाळीने मोठे नुकसान केले. तौक्ते वादळात अखेरच्या टप्प्यात असलेला आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले; परंतु आता पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे आहे.
सद्यःघडीला ऋतूमानानुसार, आंबा आणि काजूला पालवी आणि मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. बागायतदार देखील पूर्ण क्षमतेने बागांमध्ये काम करीत असताना आता अवकाळीचे संकट उभे आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार अवकाळी पावसाला सुरूवात देखील झाली आहे.दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी अवकाळी पाऊस यामुळे आंबा, काजुला आलेल्या मोहोराचे संरक्षण कसे करावे, या चिंतेत बागायतदार आहेत. या वातावरणात दोन्ही फळपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. कीटकनाशकांच्या फवारण्यांचा खर्च देखील वाढणार आहे. अलीकडे कीटकनाशकाच्या वाढलेल्या दरामुळे बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. त्यातच बदललेल्या वातावरणामुळे फवारण्यांची संख्या देखील वाढणार आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्यास आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होणार असुन बागायतदारांचे अर्थकारण देखील बिघडणार आहे.

Exit mobile version