पोलीस पोहोचण्याआधीच त्याने मुंबई सोडले
| रायगड | खास प्रतिनिधी |
नेचर एज अलिबाग रिसॉर्ट येथील बेकायदेशीर कॉल सेंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी रोहित बुटाने मुंबई सोडून गुजरातला फरार झाला आहे. अटक करण्यासाठी पोलीस कोणत्याही क्षणी येतील या भीतीने रोहितने पलायन केले असून, त्याच्या मोबाईचे शेवटचे लोकेशन हे गुजरात बॉर्डरचे दाखवत होते. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, शनिवारी अलिबाग पोलीस ठाण्याच्या परिसरात गुजरात पासिंगचा नंबर असणारी अनेक चारचाकी वाहने दिसून आली. त्यामुळे या गुन्ह्याचे गुजरात कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अलिबाग पोलिसांनी गुरुवारी नेचर एज रिसॉर्टमधील बेकायदा कॉल सेंटरवर धाड टाकून तब्बल 35 जणांना अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींची रात्री उशिरापर्यंत जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पार पडली. त्यानंतर त्यांना मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी अलिबाग पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये शेकडोंच्या संख्येने आरोपींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्यासह अन्य अधिकारी हे आरोपींची चौकशी करीत होते.
दरम्यान, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आोपी अमेरिकेतील नागरिकांशी इंटरनेट आणि ॲपच्या माध्यमातून संपर्क साधत होते. व्हायग्रा, सीयालीस, लिविट्रो अशी औषधांवर अमेरिकेत बंदी आहे. सदरची औषधे घरपोच पुरवण्याचे आमिष समोरच्या व्यक्तीला दाखवण्यात येत होत. त्या बदल्यात पेमेंटकरिता गिफ्ट कार्डचा वापर करावा, असे सांगत. ते गिफ्ट कार्ड ते कोणाच्या तरी सहाय्याने रिडीम करुन ते पेमेंट (रक्कम) हवालामार्गे भारतीय चलनात आरोपी रोहित बुटाने याच्याकडे जमा केले जायचे. रोहित हा मिराभाईंदर येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या कॉलरपर्यंत पोलिसांचा हात पोहोचण्याआधीच रोहितने गुजरातच्या दिशेने पलायन केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून रोहितचा मोबाईल ट्रॅक करण्यात येत होता. याच भीतीने त्याने गुजरात बॉर्डरवर आल्यावर मोबाईल बंद केला. लवकरच पोलीस गुजरातमध्ये त्याच्या मागावर जाण्याची शक्यता आहे. कारण, सध्या तरी रोहित हाच मास्टर माईंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. रोहित पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यावर बऱ्याच घटनांचा उलगडा होणार आहे.
गुप्तचर यंत्रणांना मागमूस नसावा?
नेजर एज रिसॉर्टवर अलिबाग पोलिसांनी 35 जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून बेकायदा कॉल सेंटर सुरु होते. याचा मागमूस अलिबाग पोलिसांना उशिरा लागला. परंतु, रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याची माहिती होती, अशी चर्चा रायगड पोलिसांच्या वर्तुळात सुरु आहे. स्थानिक पोलिसांपेक्षा रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची गुप्तचर यंत्रणा सक्षम, प्रभावी तसेच त्यांचे नेटवर्क अतिशय खोलवर असल्याचे याआधीचा इतिहास सांगतो. अलिबाग पोलिसांनासुद्धा याबाबतची माहिती मिळण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी लागला, हे भूषणावह नाही. मात्र, त्यांनी उशिरा का होईना, पण कारवाई केली. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरली म्हणायची की, त्यांनी याकडे कानाडोळा केला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल, तर ते का केले, हे स्पष्ट होणे गरजचे असल्याचे बोलले जाते.