‘सुरई’वर धनदांडग्यांची वक्रदृष्टी

अनधिकृत बांधकामामुळे दरड कोसळण्याची भिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

सुरईसह अनेक गावांचे श्रध्दास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या डोंगरावरील परिसरात धनदांडग्यांनी बेकायदेशीररित्या खोदकाम, बांधकाम सुरु केले आहे. त्यामुळे डोंगर कोसळून सुरई गावाला धोका निर्माण होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ही खोदाई व बांधकाम बंद पाडण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. शिंदे गटाकडून धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला आहे. हा लढा शेवटपर्यंत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरई गावापासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात सपाट डोंगर आहे. बाजुलाच दत्त मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी जयंती, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे या परिसराला उत्सव व यात्रेचे स्वरुप येते. सुरई येथील श्रीदत्त मंदिर ट्रस्टच्या नावाने हे मंदिर व परिसर असल्याचे सांगण्यात आले आहे. या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी लागूनच शेकडो घरे आहेत. सुमारे 18 एकर जागेत ट्रस्टचा अधिकार असताना, शिंदे गटातील भारत मोती,जीवन परदेशी यांच्याकडून धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंदिराला लागूनच असलेल्या डोंगरावरील जागेमध्ये विकासाच्या नावाखाली, बेकायदेशीररित्या खोदकाम व बांधकाम यांच्या मदतीने केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बाब ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल विभागासह पोलीस प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. पोकलन व अन्य अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे डोंगराला भगदाड पडण्याची भिती आहे. मशीनद्वारे होणाऱ्या खोदाईमुळे डोंगराला हादरे बसत आहे. त्यामुळे संपूर्ण डोंगर कोसळून गावातील घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून जीवितहानीचा प्रश्नदेखील गंभीर असल्याचे निवेदनातून सांगितले आहे. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल न घेता उलट धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राजकीय दबावाखाली महिलांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्या या धोरणाबाबत ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेत खोदकाम रोखले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधला, तो होऊ शकला नाही.

शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
डोगरांच्या पायथ्याशी असलेल्या सुरई गावात जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी आहे. मंदिरात जाण्याचा रस्ता याच शाळेकडून जात आहे. हा रस्ता अरुंद व वळणाचा आहे. तरीदेखील या रस्त्यावर पोकलन व अन्य अवजड वाहनांची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात येण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पर्यटनासाठी निधी आला होता. दरडीचे कारण सांगून सुरई ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. शासनाला तो अहवाल पाठविणार आहोत.

रमेश गोरे, उपअभियंता सा.बां. विभाग मुरुड

सुरई येथील बांधकाम प्रश्नाबाबत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमची भूमिका राहिली आहे. तहसीलदार व बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे.

विनित चौधरी, पोलीस उपविभागीय अधिकारी, अलिबाग

गावालगत असलेल्या डोंगरावर दत्त मंदिर व परिसराची जागा ट्रस्टच्या नावाची आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली धनदांडग्यांसाठी बांधकाम करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून करण्यात आला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता भारत मोती, जीवन परदेशी यांनी बांधकाम सुरु केले. गावासह ग्रामस्थ, महिलांच्या सुरक्षेसाठी या बांधकामाला विरोध करण्यात आला आहे.

सुरई महिला मंडळ
Exit mobile version