अकरा पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन
| महाड | वार्ताहर |
पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, या दृष्टीने राज्य सरकारने 11 पिकांकरिता स्पर्धा आयोजित केली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हजारो रुपयांची बक्षीस जिंकण्याची संधी यातून मिळणार आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केल्यास इतर शेतकरी प्रोत्साहन घेतील, असा हा स्पर्धेमागचा उद्देश आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे आहे. सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 गुंठे व इतर पिकांच्या बाबतीत किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा. या बाबत www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा, 8- अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.