अवेळी पावसाने रायगडमध्ये पिकांचे नुकसान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल आदी तालुक्यात अवकाळी पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यातील भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा तसेच इतर पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍यांसह बाजारपेठांतील व्यापार्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांच्या धंद्याची माती झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. कलिंगड आंबा, काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प आहेत. त्याच अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शनिवारी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे अर्ध्याअधिक जिल्ह्यात पिकांचे कमी अधिक नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे लवकरच सुरु करण्यात येणार असून, त्यानंतरच किती नुकसान झाले याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली. पावसाची सुरुवात होताच बर्‍याच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले.

रोहा तालुक्यातील शिरवली, किल्ला आणि खांब येथील शिराळी व कारलीसारख्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर, अनेक ठिकाणच्या आंब्याचा मोहर गळून गेल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत. पावसाची सुरुवात होताच वीजपुरवठादेखील खंडित झाला. या आधी झालेल्या पावसात भाताच्या मळणीसह वाल पीक, भाजीचे मळे, आंब्यांवरील मोहर नष्ट झाले होते शेतकऱ्याने दुबार वाल पीक व भाजीची लागवड केली, मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ते ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या मुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज दिवसभर मळभयुक्त ढगाळ वातावरण होते दुपारनंतर अचानक मुसळधार पावसाळा सुरवात झाली आणि साऱ्यांची धावपळ उडाली. पावसाचा हा लहरीपणा कधी थांबेल, आदीच शेतकरी कर्ज काढून बी, बियाणे, खते, अवजारे खरेदी करतो आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत आयुष्य काढतो या मुळे शेतकऱ्यांवर भीक मागायची वेळ आली आहे. प्रशासनाने आतातरी दाखल घेत शेतकऱ्यांना पाठबळ द्यावा.

Exit mobile version