पिकावरील रोगाचे व्यवस्थापन गरजेचे

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील आंबा पीक हे महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र, बर्‍याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापासून नुकसान होत आहे. शेतकरी बंधूनी कीड व रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास आंबा पिकाचे उत्पादन निश्‍चितच वाढू शकेल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे यांनी केले आहे.

तळा कृषी विभागाच्यावतीने आंबा पीक कीडरोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत बुधावारी (दि.8) शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन तळा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. तसेच, तळा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होत. तेव्हा ते बोलत होते. या प्रशिक्षणाला माणगावचे उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, रोहा कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ जीवन आरेकर, आत्मा बीटीएम सचिन लोखंडे, तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी, सर्व कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमच्या सुरवातीला शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी शेतकर्‍यांना आंबा मोहरावरील प्रमुख कीड व रोगाची माहिती दिली. तसेच, मोहराचे संरक्षण कसे करावे, त्यावरती औषधे कोणती फवारावीत, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यानंतर आनंद कांबळे यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार्‍या ‘हॉर्ट सॅप’ योजने विषयी माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की, ‘हॉर्ट सॅप’ योजने अंतर्गत तालुक्यातून निवडक आंबा बागांची निवड करण्यात आली असून प्रत्येक आठवड्याला आंबा बागेतील कीड व रोगाचे निरीक्षणे घेण्यात येत आहे. त्यामुळे वेळीच रोग व किडीचा प्रादुर्भाव लक्षात येईल व परिणामी कीड व रोगाचे नियंत्रण करणे शक्य होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

हॉर्ट सॅप योजने अंतर्गत आंबा पिकावरील तुडतुडे, फुलकिडे, फळमाशी, भूरी व करपा या किडी व रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे.

आनंद कांबळे,
तालुका कृषी अधिकारी, तळा

Exit mobile version