निसर्गाने दिलं, अवकाळीने नेलं…

परतीच्या पावसाने बळीराजा पाणावला
सुधागड-पाली | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या सणात जोरदार वारा व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला आणि शिवारात ऐन बहरात आलेल्या भातपिकांची नासाडी करुन गेला.निसर्गाने दिलं पण कर्माने नेले असं म्हणण्याची वेळ रायगडातील बळीराजावर आली.निसर्गाच्या या कोपाने त्याचे डोळेही पानावले.
ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. त्यामुळे झोडणीसाठी तयार भात भिजल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. याबरोबरच दिवाळीच्या आनंदावर देखील विरजण पडले आहे.
सध्या शेतकर्‍यांनी भाताची कापणी केली असून मळणी व झोडणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍याची तारांबळ उडाली आहे. धान्याचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. कृषी विभागाकडे अजून नुकसानीची आकडेवारी आलेली नाही.

भात कापून झोडणीसाठी चांगल्या प्रकारे रचून ठेवला होता. मात्र जोरदार व मुसळधार पावसामुळे भात भिजला आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
तुषार केळकर,शेतकरी,उद्धर

Exit mobile version