शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
| कोलाड | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु असताना कोलाड-खांब परिसरात संध्याकाळी 4 वाजता अचानक आलेल्या विज वाऱ्यासह तुफान पावसामुळे नागरिकांची तारांबल उडाली. वीज वाऱ्यासह आलेल्या या तुफान पावसामुळे घरावरील पत्रे उडाले. तसेच प्रत्येक घरासमोर लावण्यात आलेली लाइटिंग, आकाश कंदील, या वादळ वाऱ्यामुळे खाली कोसळून पडले. याचबरोबर उरलेली संपूर्ण भात पीकेही आडवी झाली. ऐन दिवाळीच्या आनंदात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
या अगोदर रब्बी हंगामातील भात लागवडीचे पुगांव, मुठवली, शिरवली, खांब, तसेच इतर काही भागात मे महिन्यात पडलेल्या पावसाने भातशेतीत पाणी साचून मोठे नुकसान झाले. काही भात पिक उभे असणारे कुजून गेले, तर काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पीके जमिनीवर लोळत वाहून त्या धानाची नासाडी झाली. त्याचे तात्काळ पंचनामे देखील वरीष्ठ पातळीवरून करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे केल्याचा प्रशासनानी दिलासा दिला. मात्र त्याची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही.
याउलट ऐन दिवाळीत दोन दिवस असाच पाऊस बारसणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आल्या नंतर तो तंतोतंत खरा ठरला असून या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोलाड परिसरात ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाला वीज वाऱ्यांसह तुफान पाऊस झाल्यामुळे गोवे गावातील चंद्रकांत पवार यांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक झाडे व पोल उलमळून पडले. यामुळे विजपुरवठा खंडित झाला आहे. तर या परिसरातील उरली सुरलेली भात पिकेही या पावसात जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
आधुनिक काळात रासायनिक खते, नांगरणी, व भात लागवडीचा खर्च वाढला असूनही याला न जुमनता शेतकरी वर्ग भात शेती करत असतो. परंतु निसर्गाच्या कोपामुळे सोन्यासारखी भात पिके मातीमोल झाली आहेत. यामुळे शासनाने भातशेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
बळीराजा पुरता हैराण
गेले काही परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दिवस प्रखर उष्णता आणि सायंकाळी पावसाचे आगमन यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. भात शेतीच्या लोंब्यांचा दाणा तयार झाला असून काही ठिकाणी भात कापणी सुरु केली आहे. दिवाळी सण आधी बहुतांशी ठिकाणी भात कापणी सुरुवात झाली आहे. मात्र आता परतीच्या पावसाने बळीराजांस मोठ्या संकटात सापडलेले आहे. भात कापणी करावी की नाही हेच विचार त्यांस स्वस्त बसू देत नाही.





