। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात पिसाळलेल्या बैलाने धुमाकूळ घातला आहे. या बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून या बैलाला पकडण्यात यश आले आहे.
कर्जत शहरातील दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलाने दोन दिवस उधळण मांडत नागरिकांवर हल्ले चढवले. या घटनांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत शहरातील दहिवली भागातील ललानी परिसर, संजयनगर आणि मुदे आदी ठिकाणी धुमाकूळ घातला होता. या पिसाळलेल्या बैलाने आदित्य कनोजिया (9) या बालकावर हल्ला करून त्याला 22 ऑक्टोबरच्या रात्री जखमी केले. त्यानंतर 23 ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण (65) आणि योगिता थोरवे (44) यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलाने जोरदार हल्ला केला. यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
याचवेळी संजयनगर इथे राहणारे अर्जुन म्हसे (70) यांच्यावरही बैलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या गंभीर हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच आणखी दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस व नगरपरिषद कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने अत्यंत धाडसाने प्रयत्न करून बैलाला नियंत्रणात आणले. बचाव मोहिमेदरम्यान परिसरातील राज्य मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पहाटेच्या सुमारास तात्काळ ऍम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून दिली. या घटनेनंतर दहिवली परिसरात नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनाने अतिरिक्त दक्षता घेतली आहे.







