आठ खेळाडूंवर कोटींची बोली

प्रो कबड्डी लीग 2024 च्या 11व्या हंगामातील लिलाव

। मुंबई । वृत्तसंस्था ।

प्रो कबड्डी लीग 2024 च्या 11व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंवर कोटींची बोली लागली. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी मुंबईत होत असलेल्या या लिलावात सचिन तंवर सर्वाधिक बोली लागणार खेळाडू ठरला. तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी 2 कोटी 15 लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. सचिन तन्वर हा करो या मरो रेडचा स्पेशालिस्ट खेळाडू आहे. अनुभवी रेडर परदीप नरवाल दुसर्‍यांदा बेंगळुरू बुल्समध्ये सामील होणार असून, फ्रँचायझीने त्याला 70 लाख रुपयांना खरेदी केले आहे.

प्रो कबड्डी लीग 2024 साठी खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सचिन तन्वर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर प्रो कबड्डीच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. इराणच्या मोहम्मदरेझा शादलोई चियानेहलाही हरियाणा स्टीलर्सकडून 2.07 कोटी रुपयांची मोठी बोली लावत त्याला करारबद्ध केले. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पवन सेहरवतला तेलुगू टायटन्सने 1.72 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले. भरतला 1.30 कोटी रुपयांची बोली लागली. मनिंदर सिंगला 1.15 कोटी, अजिंक्य पवारला 1.11 कोटी आणि यू मुंबाने 1.15 कोटींची बोली लावत सुनील कुमारला संघात घेतले.
गुजरात जायंट्सनेही गुमान सिंगला 1.97 कोटी रुपयांना करारबद्ध केले, परंतु पुढील हंगामासाठी त्यांचा संघ समतोल राखण्यासाठी त्यांना लिलावाच्या दुसर्‍या दिवशी मोठा खर्च करावा लागणार आहे. लिलावानंतर सचिन तन्वरने आनंद आणि आश्‍चर्य व्यक्त केले.

महागडे खेळाडू
सचिन तन्वर 2.15 कोटी (तमिल थलायवास), मोहम्मदरेझा शादलोई चियानेह, ईराण 2.07 कोटी (हरियाणा स्टीलर्स), गुमान सिंग 1.97 कोटी (गुजराट जायंट्स), पवन सेहरावत 1.72 कोटी (तेलुगु टायटंस), भारत हुडा 1.30 कोटी (युपी योद्धा), मनिंदर सिंग 1.15 कोटी (बंगाल वॉरियर्ज), सुनील कुमार 1.15 कोटी, अजिंक्य पवार 1.11 कोटी
Exit mobile version